*हॅशटॅग दिन (Hashtag Day)*
*@ २३ ऑगस्ट @*
*हॅशटॅग दिन (Hashtag Day)*
२३ ऑगस्ट हा हॅशटॅग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ट्विटरवर २००७ मध्ये क्रिस मेसीना ने हॅशटॅगचा प्रथम वापर सुरू केला. २३ ऑगस्ट २००७ साली १२ वाजून २५ मिनिटांनी प्रसिद्ध सोशल टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट क्रिस मसिना ने “how do you feel about using #(pound) for groups. As in #barcamp [msg]?” असं ट्विट केलं आणि तिथूनच सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंडिंग ची सुरुवात झाली. थोडंसं तांत्रिक बोलायचं झालं तर या हॅश चिन्हाचा '#' उपयोग तंत्रज्ञानाच्या जगातला १९७८ मध्ये 'सी प्रोग्रामिंग' या संगणक प्रोग्रामिंग च्या भाषे पासून ज्ञात आहे. या भाषेचे निर्माते डेनिस रिची यांनी '#' सिम्बॉल चा उपयोग सी या भाषेत केला होता जो आजही केला जातोच याशिवाय इतरही अनेक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये '#' चे वेगवेगळे उपयोग आहेत. पुढे हे हॅशटंग स्थानिक भाषा मध्येही रुढ झाले. हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून सर्वत्र लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, इन्स्टाग्राम अशा इतर सोशल नेटवर्क वर देखील लोकप्रिय होताना दिसत आहे.
सोशल नेटवर्किंग साईटवर एखादी माहिती पोस्ट केली जाते, माहितीच्या सोबत आपणास # चिन्हाला जोडून काही शब्द लिहिलेले आढळतात, त्यास ‘हॅशटॅग’ असे संबोधले जाते. जी माहिती दिली जात आहे, त्या माहितीचा विषय कोणता आहे? यावरून लक्षात घेऊन ते हॅशटॅग दिलेले असतात. मागील काही वर्षात करोनामुळे जगभरात हॅशटॅगचा वापर झाला. हॅशटॅग मुळे जगभरात 'मीटू' सारखी चळवळ उभी राहिली. गेल्या एका वर्षात मनोरंजन क्षेत्रातील हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंडिंग राहिले. यामुळे वर्षभरात या हॅशटॅगच्या वापरात १३३६ टक्क्यांनी वाढ झाली. सोशल मीडिया वर आज हॅशटॅग शिवाय पान हलत नाही. विविध मार्केटकींग एजन्सीज, कंपनी पेजेस, किंवा सामान्य वापरकर्ते हे सगळे हॅशटॅग वापरात असतात.
हॅशटॅग तयार करण्याचा एक साधा नियम आहे. कमीत कमी शब्द, शक्यतो एकच शब्द वापरावा. कारण ट्विटर किंवा इन्स्टाग्राम वर शब्द मर्यादा असतात. फेसबुक सारखं तुम्ही त्यावर लांबलचक स्टेटस टाकू शकत नाही. जर एकापेक्षा अधिक शब्द असतील तर या शब्दा मध्ये स्पेस अजिबात सोडायची नाही. सलग शब्द टाईप करायचे # आणि पुढे तुमचे शब्द. यात कुठेही स्पेस पडता कामा नये. समजा तुम्ही सोशलमीडियावर Social Media असं स्टेटस टाकलं तर या दोन शब्दांच्या मध्ये तुम्ही स्पेस देऊन तो टाकता. पण हॅशटॅग तयार करताना असं लिहून चालत नाही ते #SocialMedia किंवा #Social_Media असंच लिहावं लागतं. अंडरस्कोर (_) स्पेशल कॅरॅक्टर हॅशटॅग मध्ये चालते बाकी कोणतेही सिम्बॉल चालत नाहीत.
दहावी बारावी मध्ये असतांना किंवा अगदी पदवी परीक्षेत पेपर मध्ये महत्वाचे शब्द उत्तरात अधोरेखित करायचे असं सांगितलं जातं जेणेकरून त्याकडे परीक्षकाचं पटकन लक्ष जातं. आपल्या सोशल मीडियाच्या भाषेत यालाच आपण हॅशटॅग मुळे एखादी गोष्ट ट्रेंडिंग मध्ये आली म्हणतो आणि ते अधोरेखित म्हणजेच हॅशटॅग असा तर्क लावता येईल. आत्ताच उदाहरण म्हणजे डिलीट फेसबुक हा सुद्धा एक हॅशटॅग होता. जो खूप ट्रेंड म्हणजे प्रसिद्ध झाला आणि सोशल साईट्स वर गाजला. हॅशटॅग मुळे एक लिंक निर्माण होते. ही लिंक आपल्याला हॅशटॅग मध्ये नमूद केलेल्या विषयाशी संबंधित इतरांनी केलेल्या पोस्ट एकत्रितपणे एका वेगळ्या पानावर किंवा त्याच ठिकाणी एकत्र दाखवतो. गंमत म्हणून एखाद्या हॅशटॅगवर क्लिक करून बघा. अशाने माहितीची वेगवेगळ्या विषया नुसार वर्गवारी होते. आणि असा एकच विशिष्ट हॅशटॅग जगभरातून सोशल मीडियावर पोस्ट होत राहिला तर तो ट्रेंडिंग मध्ये आहे असं म्हंटल जातं.
फेसबुक सारख्या अप्लिकेशन मध्ये उजव्या बाजूला ट्रेण्डिंग्स दिसत असतात. क्रिस मसिना ने सोशल मीडिया वर हॅशटॅग यासाठीच आणला होता की सामान्य वापरकर्त्याला कमी कष्टात विशिष्ट माहिती एका हॅशटॅग लिंक वरून उपलब्ध होईल. अनेक मोठमोठ्या कंपनीज हॅशटॅग वापरून आपली नवीन उत्पादने, एखादी ऑफर किंवा नवीन सेवा पोस्ट करत असतात. सोशल मीडिया वरील पोल्स किंवा प्रश्नोत्तरे ह्यात हॅशटॅग वापरले जातात (म्हणजे हा त्याचा मूळ उद्देश आहे) ज्यामुळे ही सर्व माहिती एकत्रितपणे मिळेल आणि वाचणाऱ्याला त्याच प्रमाणे कंपनीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्याने फायदा होईल. मी सुद्धा पोस्ट मध्ये #INविस्तृत असं हॅशटॅग करतो, तुम्ही त्यावर क्लिक केलं तर सगळ्या पोस्ट एका खाली एक फेसबुक किंवा जिथे हा हॅशटॅग दिसेल तिथे पाहायला मिळतील. हॅशटॅग मुळे फजिती (की पोपट) झाल्याची सुद्धा उदाहरणं पाहायला मिळतात, यालाच बॅशटॅग म्हणतात. मॅक डोनाल्डस ने #McDStories अशा हॅशटॅग मार्फत आपले अनुभव मांडायची विनंती ग्राहकांना केल्यावर अनेक ग्राहकांनी त्यावर विचित्र पोस्ट टाकल्याने या हॅशटॅग ने कंपनीला पश्चाताप झाल्याची शक्यता जास्त. दुसरे उदाहरण जेपी मॉर्गन या प्रसिद्ध कंपनीच्या #AskJPM या हॅशटॅग संबंधी अशाच स्वरूपात देता येईल, तिथेही ग्राहकांनी किंवा ट्विटरकरांनी त्याची फजितीच उडवली होती.

Comments
Post a Comment