१ ऑगस्ट ✹* *लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन*
*✹ १ ऑगस्ट ✹*
*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन*
जन्म - २३ जुलै १८५६ (रत्नागिरी)
स्मृती - १ ऑगस्ट १९२० (मुंबई)
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांचे मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके 'ओरायन' आणि 'आर्क्टिक होम ऑफ वेदाज' या त्यांच्या, अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नाविन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक 'गीतारहस्य' यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. टिळकांनी आगरकर, चिपळुणकर आणि इतर सहकार्यांच्या मदतीने १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. केसरीचा मुख्य उद्देश अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा होता.
केसरी मधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परिक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यावरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये तात्काळ प्रसिद्ध झाली. १८८२ च्या शेवटापर्यंत केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूं मध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा.
सुरुवातीला आगरकरांकडे 'केसरी' चे संपादकपद तर टिळकांकडे 'मराठा' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह 'केसरी' चे संपादकपद स्वत:कडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यू पर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच 'केसरी' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल शिशुपाल की पशुपाल, टोणग्याचे आचळ, हे आमचे गुरुच नव्हेत, बादशहा ब्राह्मण झाले; हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.
Comments
Post a Comment