❀ १२ जुलै ❀* *इतिहासाचार्य वि. का. राजवाडे जन्मदिन*

 *❀ १२ जुलै ❀*

*इतिहासाचार्य वि. का. राजवाडे जन्मदिन*


जन्म - १२ जुलै १८६३ (वरसई,रायगड)

स्मृती - ३१ डिसेंबर १९२६ (धुळे)


इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. ते मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बीए पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. १८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. राजवाडे म्हणायचे, "ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही."


महाराष्ट्राच्या विचारविश्‍वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते. राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरले होते. नंतरही इतिहास संशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.


राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचं संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधन सामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता. राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकां बद्दल म्हणता येईल. राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभा शक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयास सुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary