२९ जुलै ❀* *शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मदिन
*❀ २९ जुलै ❀*
*शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मदिन*
जन्म - २९ जुलै १९२२ (सासवड,पुणे)
स्मृती - १५ नोव्हेंबर २०२१ (पुणे)
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म सासवड, पुणे येथे झाला. ते शिवचरित्र केवळ अभ्यासणारे न्हवते तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर. म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे. ’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरा पर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणा पासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.
पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाट्य असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाट्यात समावेश असतो. जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री.ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही.
शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच. स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्या बरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून, सहकार्यातून त्यांनी शिवचरित्र प्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्याना मधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.
Comments
Post a Comment