✹ ५ जुलै ✹* *शास्त्रज्ञ दिनकर धोंडो कर्वे स्मृतिदिन*

 *✹ ५ जुलै ✹*

*शास्त्रज्ञ दिनकर धोंडो कर्वे स्मृतिदिन*


जन्म - १३ जुलै १८९९ (पुणे)

स्मृती - ५ जुलै १९८०


दिनकर धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे तृतीय पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव आनंदी होते. दिनकर कर्वे यांचे शिक्षण पुणे येथे झाले. ते बीएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना बंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांची रसायनशास्त्र विषयक जाण उत्तम असल्यामुळे, ते जर्मनीच्या लॅपझिग युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते. तेथे त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना त्या विद्यापीठाने डी.फिल. पदवी प्रदान केली. डॉ.दिनकर कर्वे पुण्याला परत आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे आजीव सदस्य झाले. ते रसायनशास्राचे नामवंत प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञान प्रसारक होते. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे ते वीस वर्षे प्राचार्य होते. शिक्षणक्षेत्रातच उत्तम कामगिरी करण्याचा ध्यास डॉ. कर्वे यांनी घेतला. 


फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये ते भौतिकी रसायनशास्त्र हा विषय शिकवीत होते. त्यांचा अनुभव, विज्ञानाधारित अभ्यासू वृत्ती आणि शिस्तप्रियता लक्षात घेऊन फर्गसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांमुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विषयामध्ये आवड निर्माण झाली. फर्गसन महाविद्यालयामधील त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. त्यांच्या कडक शिस्तप्रियतेचा अनुकूल परिणाम महाविद्यालयाच्या प्रांगणात दिसून आला. दर्जाबाबत डॉ.दिनकर कर्वे यांनी कधीही तडजोड केली नाही. ते त्यांचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्यामुळे दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये फर्गसन महाविद्यालयाचे नाव अग्रगण्य झाले. त्या काळामधील विज्ञानाच्या समविचारी प्राध्यापकांचे सहकार्य मिळवून त्यांनी ‘सृष्टिज्ञान’ या नियत कालिकाचा दर्जा अधिकाधिक चांगला करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘सृष्टिज्ञान’मध्ये त्यांनी विज्ञान विषयावर बरेच लेख लिहिले. त्यायोगे विज्ञान प्रसारही केला. वीस वर्षे प्राचार्यपदाची जबाबदारी पार पाडून ते निवृत्त झाले. तथापि त्यांनी त्यानंतर सुमारे दहा वर्षे ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज’ या संस्थेचे भारतातील संचालक म्हणून कार्य केले.


डेक्कन महाविद्यालयामधील प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ प्रा.इरावती कर्वे या डॉ.दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या. ‘हिंदू सोसायटी - अ‍ॅन इंटरप्रिटेशन’ हा ग्रंथ प्रा.इरावती कर्वे यांनी लिहिला होता. त्याचे मराठीकरण डॉ.दिनकर कर्वे यांनी केले. ‘हिंदू समाज - एक अन्वयार्थ’ त्या ग्रंथाचे शीर्षक होते. त्याचे प्रकाशन असे ११ ऑगस्ट १९७५ रोजी झाले होते. १९५९ साली त्यांचे ज्येष्ठ बंधू रघुनाथ कर्वे यांनी ‘संतती नियंत्रण: विचार व आचार’ हे पुस्तक लिहिलेले होते त्याची अभ्यासपूर्ण आणि विज्ञानाधिष्ठित प्रस्तावना  डॉ.दिनकर कर्वे यांनी लिहिलेली होती. १९६४ साली प्रकाशित झालेल्या ‘ए हिस्टरी ऑफ एज्युकेशन इन इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ या पुस्तकाचे डॉ.दिनकर कर्वे सहलेखक होते. त्यांनी ‘दि न्यू ब्राह्मण्स: फाइव्ह महाराष्ट्रीयन फॅमिलीज’ महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेला होता. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वडलांसह तत्कालीन सामाजिक कार्याला झोकून देणाऱ्या पाच कुटुंबीयांच्या कार्याचा आढावा  घेतला होता.


१९७४ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेते शास्रज्ञ कोनराड झचारियस लॉरेंझ यांनी ‘सिव्हिलाइझ्ड मॅन्स एट डेडली सिन्स’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. डॉ.कर्वे यांनी त्याचे भाषांतर केले होते. मानववंश शास्त्रज्ञ ब्रोनिस्लाव्ह मॅलिनोवस्की यांनी लिहिलेल्या ‘सेक्स अ‍ॅन्ड रिप्रेशन इन सॅव्हेज सोसायटी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असंस्कृत समाजातील लैंगिकता’ या शीर्षकाखाली डॉ.कर्वे यांनी केला. १९७८ साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे ते पुस्तक प्रकाशित झाले. बुद्धिप्रामाण्य आणि विचारांची तर्कशुद्धता यांवर डॉ. दिनकर कर्वे यांचा संपूर्ण विश्वास  होता. त्याचा परिपाक म्हणून धार्मिक कर्मकांड; समाज ज्याला धर्म मानतो, त्याची सबंध चौकट, देवाच्या अस्तित्वावर विश्वास या सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या होत्या. ते कट्टर निरीश्वरवादी होते. आपल्या मतीला जे पटेल तेच करण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे ते प्रवाहपतित झाले नाहीत.




********************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary