✹ २१ जुलै ✹* *लेखक राजा राजवाडे स्मृतिदिन*
*✹ २१ जुलै ✹*
*लेखक राजा राजवाडे स्मृतिदिन*
जन्म - १ जानेवारी १९३६ (देवरूख,रत्नागिरी)
स्मृती - २१ जुलै १९९७
लेखक राजा राजवाडे यांचा जन्म देवरूख जवळच्या निवे बुद्रुक जि.रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण, देवरूखच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल मधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज मधून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए झाले. त्यावेळी नोकऱ्यांचा सुकाळ होता. राजा राजवाडे यांनी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये नाव नोंदवलं. तिथून त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. तोपर्यंत ते गिरगावात राहायला आले होते. १९६५ च्या सुमारास राजा राजवाडे यांनी लेखन सुरू केले. १९६२ साली ‘स्त्री’ मासिकात ‘उन्हातलं घर’ ही कथा पहिल्यांदा आली. ते गिरगावात राहात असल्याने, मुंबईतलं साहित्यिक क्षेत्र जवळपासचं. तिथून साहित्य संघ, मौजचं ऑफिस, मॅजेस्टिकचं ऑफिस सर्व जवळपास. त्यामुळे अनेक नावाजलेल्या लेखक-कवींची पायधूळ त्यांच्या गिरगावच्या घराला लागलेली. या साहित्यिकांमध्ये ठळकपणे आरती प्रभू, वसंत सावंत, केशव मेश्राम, श्रीपाद भागवत, मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे अश्या अनेक साहित्यिक येथे असत.
राजा राजवाडे यांचि पहिली कादंबरी चांदण्यातलं ऊन. जवळपास १३ वर्षे महानगरपालिकेत नोकरी केल्यानंतर, त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा, चिकाटी, उत्साह पाहून त्यांचे स्नेही वैद्य यांनी ‘सिडको’ या गृहनिर्माण संस्थेसाठी नोकरी करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी म्हणजे १९७३ला ते ‘डेव्हलपमेंट ऑफिसर’ म्हणून सिडकोत रुजू झाले. त्यावेळी त्यांचं ऑफिस नरिमन पॉइंट, निर्मल भवन येथे होते. वास्तविक पाहता सिडको ही गृहनिर्माण संस्था होती. आपल्या अधिकाराचा वापर करून, त्यांना एखादा मोठा फ्लॅट मिळवता आला असता, पण आयुष्यात जवळपास १९८६ पर्यंत ते गिरगावात त्या जुन्या खोलीत राहत होते. एकतर त्यांना गिरगावातील साहित्य संस्कृती मनापासून आवडत होती. १९८० च्या सुमारास, त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘सायाची पाने’ हा प्रसिद्ध झाला. त्याचे प्रकाशक होते त्यांचे मित्र वामन देशपांडे. राजा राजवाडे हे खूप भावुक होते. म्हणूनच ‘सायाची पाने’ या शीर्षकाची कविता त्याचं भावविश्व उलगडून दाखवते-
गरगरत पडतात सायाची पाने
कोरीत वर्तृळे दाटलेल्या धुक्यावर
तसेच आहेत हे आलेख कोरलेले
स्मृतीने एखाद्या व्याकूळ मनावर
याच कवितासंग्रहात ‘उन्मादक अभंग’ आहेत. राजा राजवाडे यांनी जवळपास शंभर असे अभंग लिहिले. त्यातील काही अभंग सायाची पाने यात आहेत. उदाहरण द्यायचे तर-
तुझ्या अंगातला गाभुळला ऋतू
जातो आहे ऊतू अंगोपांगी
सुचतात मला कोयलाची गाणी
तुझी न्हाणी धुणी पाहताना
वास्तविक राजा राजवाडे हे विचाराने संपूर्णपणे कम्युनिस्ट होते. तरुण भारत मध्ये तर संपूर्ण एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस राजा राजवाडे यांनी ‘उतरती उन्ह’ हे सदर चालवलं. तसेच ‘ललित’ मध्ये ‘उदंड झाली अक्षरे’, ‘सोबत’ मध्ये ‘सप्तरंग’ त्याच प्रमाणे मार्मिक, धर्मभास्कर, नवशक्ती, रत्नागिरी टाइम्स यांसारख्या अनेक वृत्तपत्रांत, मासिकांत त्यांनी सदर लेखन केलं. त्यांचं कथालेखन हे रोजच्या दैनिक घटनांवर आधारित त्यांच्या कथा असायचे म्हणजे रस्त्यावर झोपणाऱ्या माणसांपासून ते कोकणातल्या घरापर्यंत त्यांचं लेखन सर्वत्र भ्रमण करायचं. अगदी उल्लेखण्याजोग्या कादंबऱ्या म्हणजे 'धुमसणारं शहर, कार्यकर्ती, अस्पृश्य सूर्य, दुबई दुबई' या आहेत.
राजा राजवाडे यांचा त्यांच्या मित्रावर खूप लोभ. म्हणूनच त्यांच्या ‘दोस्ताना’ या व्यक्तिचित्रण संग्रहात त्यांनी आरती प्रभू, नारायण सुर्वे, रमेश मंत्री, वसंत सावंत, श्याम जोशी, मधु मंगेश कर्णिक या मित्रांबद्दल खूप प्रभावीपणे लिहिले आहे. आपल्या जवळच्या मित्रांचं आजारपण किंवा मृत्यू ते सहन करू शकत नव्हते. मला आठवतं कधी वसंत सावंत, रुग्णशय्येवर होते, तेव्हा आपल्या या मित्राला भेटायला जायची हिंमत ते करू शकले नाहीत. पण हॉस्पिटल मध्येच कविवर्य सावंतांना ‘कोकण साहित्यभूषण’ पुरस्कार देण्यासाठी धावपळ करण्यासाठी ते आघाडीवर होते. एवढे मित्रांच्या बाबतीत हळवे होते.
साहित्य व्यवहारात त्यांनी आपली मते खूप परखडपणे मांडली, म्हणजे विंदांनी गणपतीवर एक विरूपिका लिहिली. ती विरूपिका राजा राजवाडे यांना सहन झाली नाही. त्यांनी ‘सोबत’ या मासिकातून झोड काढणारा लेख लिहिला. कोमसापच्या अलिबागच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना श्री. ना. पेंडसे यांनी इंग्रजीची वाखाणगी करणारं आणि मराठीची अवहेलना करणारे भाषण केले. त्यावेळी कोमसापचे पदाधिकारी असूनही त्यांनी श्री.नांच्या भाषणावर आक्षेप घेत आपला जाहीर निषेध नोंदविला.
त्याचप्रमाणे गोविंदराव तळवलकरांनी एका भाषणात, ‘आपण मराठीतलं साहित्य वाचत नाही’ असं म्हटलं. तेव्हा राजा राजवाडे यांनी गोविंदरावांना "जर तुम्ही मराठीतलं काही वाचत नाही तर मराठीतल्या एका प्रमुख वृत्तपत्राचे संपादक म्हणून राहण्याचा तुम्हाला काय अधिकार होता?" असा प्रश्न केला. याच गोष्टीची चिड येऊन १९९६च्या हिवाळीत बाबांनी ‘मराठी बाणा’ हा दिवाळी अंक संपादित केला. त्यात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे किती तरी लेख नामवंत लेखकांकडून लिहून घेतले. त्यात दुर्गा भागवत, माधव गडकरी, प्रा. मं.वि. राजाध्यक्ष, प्रा. कोडोलीकर, डॉ. सुभाष भेंडे, मधु मंगेश कर्णिक यांचे लेख होते. नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ साली, आचार्य अत्रे यांची जन्मशताब्दी असल्याने, आचार्य अत्रे यांच्या जीवनावर व साहित्यावर हिवाळी विशेषांक बाबा संपादित करणार होते. पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
१९९६ साली बाबा नोकरीतून निवृत्त झाले. त्याचवेळी कोमसाप जोरदारपणे कोकणात कार्य करत होती. श्री अरुण आठल्ये यांच्या निधनानंतर कोमसापच्या मुंबई जिल्हय़ाच्या अध्यक्षपदी बाबांची निवड झाली. कोमसापच्या अंतर्गत त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. कोमसापचं त्रमासिक ‘झपूर्झा’च्या संपादनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. राजा राजवाडे यांनी ३० कांदबऱ्या, १४ विनोदी कांदबऱ्या, ८ कथासंग्रह, ९ विनोदी कथासंग्रह, ४ कविता संग्रह, १ व्यक्तिचित्रणपर तर ३ ललितगद्य व २ चित्रपट पटकथा (वऱ्हाडी झटका पुणेरी फटका, शंभू गबाळे) इतके विपुल लेखन केले. तर सलग ३५ वर्षे १८ नियतकालिकांतून त्यांनी स्तंभलेखन केले. राजा राजवाडे यांचे चिरंजीव म्हणतात बाबा नावाप्रमाणेच राजा होते. एक ‘राजा लेखक’ आणि ‘एक राजा माणूस’.
Comments
Post a Comment