❀ १४ जुलै ❀* *सुधारक गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन*

 *❀ १४ जुलै ❀*

*सुधारक गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन*


जन्म - १४ जुलै १८५६ (सातारा)

स्मृती - १७ जून १८९५ (पुणे)


गोपाळ गणेश आगरकर हे मराठी पत्रकार नि थोर समाज सुधारक होते. १८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. १८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता ऐहिकता, बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धि प्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळ आगरकरांकडे जाते. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.


आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. 


‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे' असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात १९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. २०१० मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२ साली मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री.सय्यदभाई यांना देण्यात आला. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारिते साठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२ साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता.



********************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary