@ १ जुलै @* *राष्ट्रीय डॉक्टर दिन*
*@ १ जुलै @*
*राष्ट्रीय डॉक्टर दिन*
१ जुलै रोजी भारतात 'राष्ट्रीय डॉक्टर दिवस' म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही.
आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणाऱ्या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणाऱ्या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. सध्या संपूर्ण जगभर कोरोनाव्हायरस थैमान घालत असताना डॉक्टर्स मात्र तहानभूक विसरून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. आजचा हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.
********************************

Comments
Post a Comment