@ २६ जून @* *राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन*


 *@ २६ जून @*

*राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन*


छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यांचा २६ जून १८७४ रोजी कसबा बावडा येथे झाला. १८९४ साली त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेका नंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले. छत्रपतीच्या अंतःकरणा मध्ये  प्रचंड वात्सल्य होते. ते जसे स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते. आपल्या राज्यात आमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणा शिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली. बोर्डिंग सिटी अशी कोल्हापूरची ओळख होती. पुणे येथील श्री. शिवाजी मराठा सोसायटी, ऑल इंडिया श्री. शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथील उदाजी मराठा शिक्षण संस्था, नागपूर येथील शिक्षण संस्था, चेन्नई येथील शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात शाहू महाराजांचा पुढाकार होता. 


राजर्षी शाहू महाराजानी १९१७ साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. १९१९ साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. त्यांनी भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर १९०८ साली बांधले. १८९९ साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली. बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली. डोणे नावाचे धनगर विद्वान त्या शाळेचे प्राचार्य होते. भास्करराव जाधव यांनी 'घरचा पुरोहित' नावाचे पुस्तक लिहिले. 


शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी १९०२ साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय. प्रशासनातील एकाधिकारशाहीला त्यांनी पायबंद घातला. त्यांनी सर्व जातींना प्रशासनात प्रतिनिधित्व दिले. शाहू महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांनी भविष्य, पंचांग, मुहूर्त कधीही पाहिले नाही. भविष्य सांगण्यासाठी आलेल्या जोतिष्याला तुरुंगात डांबून त्याला बुद्धिप्रामाण्यवादाचे महत्व पटवून दिले. त्यांनी भाकडकथा, पुराणकथा नाकारून प्रतिगामी विचारांना नेस्तनाबूत केले. त्यांनी ग्रंथप्रामान्य नाकारले. आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. ज्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेले होते, अशा जातीवरचे निर्बंध राजांनी उठवले. त्यांना नियमित हजेरीतुन मुक्त केले. त्यांना आपल्या राज्याच्या संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावरती नेमले. 


अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी ते अस्पृश्याच्या घरी जेवले. अस्पृश्यांना आपल्या राजवाड्यावर स्नेहभोजन ठेवले. अन्यायग्रस्त गंगाराम कांबळेला न्याय देऊन त्याला हॉटेल टाकून दिले. त्या हॉटेलला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी जात असत. महार, मांग, चांभार इत्यादी पैलवाना बरोबर देशभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती खेळावी म्हणून त्यांना जाट, सरदार, पंडित अशी नावे दिली. जातिभेद नष्ट व्हावा यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली. याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबा पासून केली. त्यांनी आपली बहीण चंद्रप्रभादेवी यांचा विवाह इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर निश्चित केला, तो पुढे राजाराम महाराजांनी लावून दिला, असे सुमारे २५ आंतर जातीय विवाह घडवून आणले, यातून त्यांनी मराठा, धनगर आणि इतर जाती एकमेकांचे विरोधक नसून नातेवाईक आहेत, हे सिद्ध केले. म्हणजे शाहू महाराज हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते.


छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था मोडणारी व समता प्रस्थापित करणारी परंपरा आहे, छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था पाळणारी विषमतावादी परंपरा नाही, छत्रपतींची परंपरा प्रगल्भ परंपरा आहे, ती संकुचित नाही. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. 'मूकनायक' या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले, "बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत". शाहू महाराजांच्या मुला मुलींच्या लग्नात करवले म्हणून भटक्या विमुक्त, दलित जातीतील समवयस्क मुला मुलींना सोबत घेतले होते, जेणेकरून विषमता नष्ट व्हावी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते.


शाहू महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू मुस्लिम हा भेद केला नाही. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी त्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. आपल्या राज्यातील गरिबातल्या गरीब मुस्लिमांना कुराण मराठी भाषेत वाचता यावे, यासाठी अरबी भाषेतील कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी २५ हजार रुपयाची देणगी दिली. शंभर वर्षांपूर्वीची ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. शाहू महाराजांनी पाटगावच्या मौनी बाबाच्या मठाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील मुस्लिमांच्या मशिदीच्या बांधकामासाठी दिली, तर रुकडीतील पिराच्या देवस्थानाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील अंबाबाई मंदिराच्या बांधकामासाठी व दिवाबत्तीसाठी दिली, इतका सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता.


शाहू महाराजांनी शाहीर लहरी हैदर, चित्रकार आबालाल रहमान, गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेब, मल्लविशारद बालेखान वस्ताद,गायक अभिनेता बालगंधर्व यांना सर्वतोपरी मदत केली. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, शाहू महाराज म्हणतात, "शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही. जातीभेद हा मानवी विकासापुढील मोठा अडथळा आहे. औषधाला सुद्धा दारू पिऊ नका. अन्न क्षेत्राला पैसे देण्यापेक्षा शिक्षणाला पैसे द्या, ज्यातून स्वावलंबी, स्वाभिमानी पिढी निर्माण होईल". अशा क्रातिकारक विचारांचे शाहू महाराज होते.


शाहू महाराजानी आपल्या राज्यात सर्वांचा विकास आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनी व्यवस्थे विरुद्ध उघडपणे संघर्ष केला, परंतु आज सामाजिक वातावरण बिघडवले आहे, जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पेरले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सर्व समाज बांधवांनी एकोपा जपावा, हे शाहूचरित्र सांगते. शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा आपण कायम ठेवणे, हेच खरे शाहू प्रेम आहे. त्यांच्या विचारांचे आपण आचरण करूया. आज शाहू महाराजांची जयंती आहे, जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !



"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

Comments

  1. छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन अभिवादन....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 11th English Chapter 1 The Portrait of a Lady