*जागतिक बालकामगार निषेध दिन*

 *@ १२ जून @*

*जागतिक बालकामगार निषेध दिन*


'बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी. मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा ! पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते. कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार. १२ जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं. १४ वर्षा खालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप. समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे.


१२ जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात २००४ पासून जिल्हधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत ९ ते १४ वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.


अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण ३७ विशेष प्रशिक्षण केंद्र विविध वस्त्यांमध्ये कार्यान्वित आहेत. प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात साधारत: १५० कर्मचारी काम करीत आहे. या प्रकल्पांतर्गत बालकामगारांना विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो. बालकामगारांना अनौपचारिक शिक्षणा बरोबरच त्यांच्यातील कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध ट्रेडचे व्यवसायपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते तसेच प्रकल्पाचे कार्य व बालकामगार प्रथेविषयी जनमानसात जनजागृती करण्यात येते.


*बालकामगारांना प्रकल्पांतर्गत मिळणारा लाभ*


प्रत्येक बालकामगाराला दरमहा १५० रुपये विद्यावेतन देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागा मार्फत विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमाचा विशेष प्रशिक्षण केंद्रात अवलंब करण्यात येतो, शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. बालकामगारांना त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्यातील कौशल्यास अनुरूप असे व्यवसाय पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते, बालकामगारांना विविधांगी उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येते. तसेच जीवन कौशल्य राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पा मार्फत बालकामगारांना जीवन कौशल्य विषयाचा प्रभावी संवाद कौशल्य, स्वत:ची जाणीव, प्रभावी नेतृत्व, निर्णयक्षमता, ध्येय निश्चिती, भावनिक समायोजन, कल्पकता, निरीक्षण निरोगी जीवन यासारख्या विविध विषयांच्या माध्यमातून भावी आयुष्यात सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयत्न केले जातात.


अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात प्रकल्पाचे कामकाज सुयोग्यरित्या सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरूवाती पासून २०१७ पर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त बालकामगारांना नियमित शाळेत दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पामार्फत बालकामगारांना जन्म दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, सुकन्या योजना, मतदान ओळखपत्र, जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यासाठी राज्य शासनाने १९८६ सालापासून बालकामगार विरोधी कायदा बनविला असून या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास भविष्यात बालकामगार होण्यास आळा बसेल. मुले शिकावी म्हणून अशा अनेक योजना शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या माध्यमातून बालकामगार होवू नये म्हणून सजगता निर्माण केली जात आहे. त्याला जिल्हास्तरावर भरघोस प्रतिसाद मिळत आहे, हेच या प्रकल्पाचे खरे यश आहे.



********************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary