साहित्यिक साने गुरुजी स्मृतिदिन*

 *✹ ११ जून ✹*

*साहित्यिक साने गुरुजी स्मृतिदिन*



जन्म - २४ डिसेंबर १८९९ (पालगड,रत्नागिरी)

स्मृती - ११ जून १९५०

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. वडील खोताचे काम करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्या मध्ये एमए ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. 

अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.

‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील 'बलसागर भारत होवो' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. 

स्वातंत्र्य चळवळीतील सहभागा बद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले. साने गुरुजींचे 'श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले, ते १९३५ साली. ‘आई माझा गुरु - आई माझे कल्पतरु’ असे तिचे वर्णन ‘श्यामची आई’ या पुस्तकातून केले आहे. 'श्यामची आई' हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचा एक सोहळा आहे. अर्थात, याचा अर्थ गुरुजींच्या सार्याच आठवणी सुखद आहेत, असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले, त्याचीच एका अर्थाने ही 'कथामाला` आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना, त्याबद्दलची खंत बिलकूलच नाही. उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला, असे नाही तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावयाचे याचेच त्यास शिक्षण दिले.


'श्यामची आई' ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली, ते खर्या अर्थाने गुरुजींचे 'माझे विद्यापीठ' च होते. स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात : 'दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे' असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्या बरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही घळघळा पाणी वाहत असे. अश्रू हा गुरुजींच्या सार्याच साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुजींच्या साहित्याची संभावना रडके वा पळपुटे साहित्य अशा शब्दांत भलेही करोत त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणारी नाही. 

आचार्य अत्रे यांच्या सारख्या अत्यंत आक्रमक प्रकृतीच्या माणसालाही ती समजू शकली होती त्यामुळेच त्यांनी या आठवणींवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट तर काढलाच, शिवाय 'मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र' असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत होवो’ ह्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. स

धना, सेवादल आणि आंतरभारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. 

आचार्य विनोबा भावे-रचित गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागा बद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. साने गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. 

*******************************

Comments

Popular posts from this blog

English Core Grade 12 th Syllabus

CBSE Class 12th Flamingo Poem My Mother at Sixty-Six

CBSE Class 12 Core English Chapter 1 The Last Leesson Summary